सहकार, उद्योग आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा
कोल्हापूर, दि. २० : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज इचलकरंजी येथे कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमात कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार सोहळ्याचाही शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान नूतन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोनशिलेचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था, उद्योग आणि शेतकरी विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार डॉ. राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे, महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेची वाटचाल
‘महाराष्ट्राचे मँचेस्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहराच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाशी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे घनिष्ठ नाते आहे. वस्त्रोद्योग, लघुउद्योग, व्यापारी वर्ग आणि शेतकरी यांना आर्थिक पाठबळ देत या बँकेने गेल्या अनेक दशकांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या बँकेची स्थापना ५ नोव्हेंबर १९६२ रोजी झाली असून ७ फेब्रुवारी १९६३ पासून बँकेने प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केली. सहकारी बँकिंग क्षेत्रात विश्वासार्हता, आधुनिक सेवा आणि आर्थिक शिस्त यांमुळे बँकेने राज्यांच्या सीमा ओलांडत बहुराज्यीय संस्थेचा दर्जा प्राप्त केला आहे.
चार राज्यांमध्ये विस्तारलेल्या शाखा
सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये मिळून बँकेच्या ५५ शाखा कार्यरत आहेत. विविध आर्थिक सेवा, उद्योगांना कर्जपुरवठा, कृषी वित्तपुरवठा आणि आधुनिक बँकिंग सुविधांमुळे बँकेने व्यापक ग्राहकवर्ग निर्माण केला आहे.
बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेच्या ५५ शाखांमार्फत ८५ हजार ८३५ सभासदांना सेवा पुरविण्यात आली. बँकेचे भागभांडवल ८१ कोटी रुपयांपेक्षा अधिक, ठेवी २ हजार ९७५ कोटी रुपये, तर कर्जवाटप १ हजार ८९४ कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.
आधुनिक बँकिंग सेवांवर भर
ग्राहकांना पारंपरिक सेवांसोबत आधुनिक आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर बँकेचा भर राहिला आहे. स्वयंप्रकाश सौर ऊर्जा कर्ज, कृषी कर्ज, अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी वित्तपुरवठा, विविध उद्योजकता योजना तसेच शासनाच्या विविध योजनांशी संलग्न कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
याशिवाय परदेशी व्यापारासाठी आवश्यक असणारी पतपत्रे, बँक हमी, परकीय चलन विनिमय सेवा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तांत्रिक सुविधा यांचाही लाभ ग्राहकांना दिला जात आहे. उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रासाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देत बँकेने रोजगारनिर्मिती आणि उद्योजकता विकासात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
तरुण उद्योजक आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन
सहकारी बँकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी विविध कर्ज योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच शेतकरी, स्वयंरोजगार इच्छुक आणि सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील लाभार्थ्यांनाही विशेष प्रोत्साहन दिले जात असल्याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली.
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणे, शेतकरी आणि उद्योजकांना सक्षम करणे तसेच आर्थिक समावेशनाचा विस्तार करणे या उद्दिष्टांवर बँकेची पुढील वाटचाल केंद्रित राहणार असल्याचे कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले.
नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनामुळे बँकेच्या कामकाजाला अधिक आधुनिक स्वरूप प्राप्त होणार असून ग्राहक सेवा, तांत्रिक सुविधा आणि प्रशासकीय कार्यक्षमता आणखी बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
