भोंदूबाबाची सखोल चौकशी करण्यासाठी मिळाली वाढीव पोलिस कस्टडी
नाशिक, दि. ३० : शहरात उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग आला असून, आरोपीला न्यायालयाने पुन्हा पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने अशोक खरात याला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी देत तपासासाठी १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली.
सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीला तीव्र विरोध दर्शवला. मात्र, आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे स्पष्ट करत पोलिसांनी अधिक वेळेची मागणी केली. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने पोलीस कोठडी वाढवण्याचा निर्णय दिला.
विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) न्यायालयात धक्कादायक माहिती सादर करण्यात आली. त्यानुसार, अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी पेढे तसेच खारट किंवा कडवट चवीचा द्रव पदार्थ वापरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित महिलांना हा द्रव पाजल्यानंतर आणि पेढा खायला दिल्यानंतर त्यांच्यावर परिणाम होत असे.
तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा पदार्थ सेवन केल्यानंतर महिलांना मळमळ, डोके गरगरणे किंवा शरीर जड झाल्यासारखे वाटत असे. या अवस्थेचा फायदा घेत आरोपी केबिनमधील दिवे बंद करून महिलांवर अत्याचार करत असल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोपीने वापरलेला द्रव पदार्थ आणि पेढ्यातील संभाव्य गुंगी आणणारे घटक अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. याबाबत आरोपीकडून कोणतीही ठोस माहिती मिळालेली नसल्याने तपासात अडथळे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात मांडणी करताना या द्रव पदार्थाचा आणि पेढ्याचा वैज्ञानिक तपास करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. त्यासाठी वेळ देण्याची विनंती त्यांनी केली होती.
सध्या एसआयटीकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पुढील दोन दिवसांत या गूढ द्रव पदार्थाचे स्वरूप, त्यातील घटक तसेच पेढ्यातील संभाव्य औषधी मिश्रण याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
