काल प्रदर्शित झालेल्या ‘लास्ट स्टॉप खांदा’ ची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात; जाणून घ्या कसा आहे सिनेमा
“माझं प्रेम ना दुसऱ्यासाठी मारताना रोज बघतो मी !” आपल्या प्रेयसीवर एकतर्फी पण जीवापाड प्रेम करणाऱ्या किरणचा ‘लास्ट स्टॉप खांदा’ Last Stop Khanda चित्रपटातला हा संवाद कानांवर पडताच आपल्यालाही भूतकाळातल्या आपल्या एकतर्फी प्रेमाची आठवण आल्या शिवाय राहत नाही. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या श्रमेश बेटकर लिखित – अभिनित व विनीत परुळेकर दिग्दर्शित ‘लास्ट स्टॉप खांदा’ हा चित्रपट शुक्रवारी, दिनांक २१ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. मराठीत अभावानेच बनणाऱ्या रोमॅंटिक-कॉमेडी(RomCom) सदरातील या धम्माल चित्रपटाची सुरुवातच निखिल बने सोबतच्या विनोदी तडक्याने होते. पुढे श्रमेशचं म्हणजेच किरणचं एकतर्फी प्रेम असलेल्या व नुकतंच ब्रेकअप झालेल्या जुईली टेमकर चा यात प्रवेश होऊन खऱ्या अर्थाने चित्रपटाचा पुढचा प्रवास सुरु होतो.
दरम्यान, ब्रेकअप झालेल्या आपल्या बेस्ट फ्रेंड कम एकतर्फी प्रेमाला आपलं खरं प्रेम व्यक्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करताना होणारी किरणची घालमेल मनाला भावते. मध्यंतरापूर्वी काहीसं सावकाश पुढे सरकणारं चित्रपटाचं कथानक मध्यंतरानंतर अगदी शेवटपर्यंत तुम्हाला भावनांच्या रोलर-कोस्टर राईडवर आरूढ व्हायला लावतं. एका बाजूला प्रभाकर मोरेंच्या जोडीने नव्या कलाकारांनी केलेली हास्याची तुफान फटकेबाजी तुम्हाला लोटपोट करते तर त्याच वेळी, दुसऱ्या बाजूला श्रमेश व जुईली या दोघांमधली काही हळवी दृश्य एकतर्फी प्रेमातला ‘दर्द’ उत्कटतेने प्रकट करतात. या साऱ्याच्या जोडीला संगीतकार श्रेयस राज आंगणे याने दिलेलं पार्श्वसंगीत मनाला स्पर्शून जातं. मुख्य भूमिकेत असलेल्या श्रमेश बेटकर व जुईली टेमकर यांचा हा पहिलाच चित्रपट असून त्यांनी केलेला सराईत अभिनय हा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ज्याने लीलया पेलली त्या विनीत परुळेकरचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे यावर विश्वास बसत नाही. पदार्पणातल्या चित्रपटातून त्याने आपल्या दिग्दर्शनीय कौशल्यातला व्यावसायिकपणा अधोरेखित केलेला पाहायला मिळतो. या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे उत्तम छायाचित्रण. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नदुर्ग किल्ला, भाट्ये बीच, गावखडी समुद्रकिनारा, नागमोडी रस्ते चित्रपटगृहाच्या पडद्यावर पाहणं डोळ्यांसाठी एक सुखद अनुभव ठरतो.
संगीतकार श्रेयस राज आंगणे आणि किशोर मोहिते यांनी संगीतबद्ध केलेली सर्व गाणी हि श्रावणीय आहेत. ज्यात सध्याचा आघाडीचा गायक सुहास सावंत याने गायलेलं लास्ट स्टॉप खांदा व खुद्द श्रेयस ने गायलेले पिरमाचं तुफान हि गाणी विशेष लक्षात राहतात. चित्रपटाचं आणखी एक आकर्षण म्हणजे प्रभाकर मोरे व धनश्री काडगावकर यांच्यावर चित्रित झालेलं ‘शालू झोका दे गो मैना’ हे धम्माल गाणं. चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद दस्तुरखुद्द श्रमेश बेटकर यानेच लिहिले आहेत. चित्रपटात निखील बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश कापरेकर, अशोक ढगे व प्रियांका हांडे अशी हास्याची पेरणी करणारी स्टारकास्ट आहे. चित्रपटाचे छायांकन हरेश सावंत यांचे असून कलादिग्दर्शक केशव ठाकुर आहेत.
२ तास २५ मिनिटांचा हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. प्रेमाच्या सात टप्प्यांतील कोणत्या टप्प्यापर्यंत किरणचं प्रेम पोहोचतं हा सस्पेन्स चित्रपट सिनेमागृहात पाहिल्यावरच तुम्हाला कळू शकतं.
