शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘लास्ट स्टॉप खांदा’ ची समस्या एका कॉलवर राज ठाकरेंनी सोडवली
साचेबद्ध चित्रपटांना कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी नवं पाहायला मिळण्याची आशा
मुंबई, दि. १९: या शुक्रवारी म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या बहुचर्चित “लास्ट स्टॉप खांदा” Last Stop Khanda या चित्रपटाच्या टीम ने नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्याला कारणही विशेष होतं. लास्ट स्टॉप खांदा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असतानाच नेमक्या वेळी चित्रपटगृह तसेच प्राईम टाईम मिळण्यात निर्मात्यांना अडचण येत होती. यावेळी राज ठाकरे यांनी नेमकी समस्या जाणून घेतली व तात्काळ फोनाफोनी करत योग्य संख्येत चित्रपटगृह व प्राईम टाईम मिळेल याची व्यवस्था केली.
राज ठाकरे यांनी उपस्थित कलाकारांकडून चित्रपटाविषयी जाणून घेतले तसेच सर्व टीमला शुभेच्छाही दिल्या. ऐन वेळी पाठीशी उभे राहिलेल्या राज ठाकरेंचे ‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाच्या टीम ने आभार मानले. या चित्रपटातल्या प्रभाकर मोरे व धनश्री काडगावकर यांच्यावर चित्रित झालेल्या ‘शालू झोका दे गो मैना’ व आघाडीचा गायक सुहास सामंत याने गायलेल्या चित्रपटाच्या शीर्षक गीताने सध्या सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. दोनच दिवसांपूर्वी “लास्ट स्टॉप खांदा”चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यालाही तुफान प्रतिसाद लाभत आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम श्रमेश बेटकर लिखित व विनीत परुळेकर दिग्दर्शित “लास्ट स्टॉप खांदा” हा एक प्रेमपट(Romantic Cinema) आहे. चित्रपटाचा लेखक दस्तुरखुद्द श्रमेश, मुख्य भूमिकेत असून त्याच्या जोडीला जुईली टेमकरच्या रूपाने एक ताजा व नवा चेहरा मराठी प्रेक्षकांना स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण हे निसर्गसौंदर्याने नटलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालं आहे. त्यामुळे चित्रपटगृहात हा चित्रपट पाहणे रसिक प्रेक्षकांसाठी नक्कीच नेत्र सुखद अनुभव ठरेल यात शंकाच नाही.
चित्रपटात प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश कापरेकर, अशोक ढगे व प्रियांका हांडे अशी हास्याची पेरणी करणारी स्टारकास्ट आहे. चित्रपटाचे छायांकन हरेश सावंत यांचे असून कलादिग्दर्शक केशव ठाकुर आहेत. या चित्रपटाला संगीतकार श्रेयस राज आंगणे आणि किशोर मोहिते यांचे संगीत लाभले आहे. प्रदिप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत.
Photo Credit – Juilee Temkar FB
