राहुल गांधी यांच्या जन्मदिनी जाणून घ्या थोडं त्यांच्याविषयी
आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा जन्मदिन आहे. त्यांचा जन्म १९ जून १९७० ला नवी दिल्लीत भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी व माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या पासून झाला. ते आपल्या माता-पित्याच्या दोन मुलांमध्ये मोठे आहेत.
१६ डिसेंबर २०१७ रोजी राहुल गांधी यांची काँग्रेस च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मागील लोकसभा कार्यकाळात ते उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत होते, या वेळी स्मृती इराणी यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते केरळ मधील वायनाड या मतदारसंघातूनही उभे होते. तेथून त्यांचा विक्रमी मतांनी विजय झाला.

मागील लोकसभा कार्यकाळात राहुल यांनी आपली छाप पडण्याचा प्रयत्न केला व त्यात ते बऱ्यापैकी यशस्वीही झाले. ‘राफेल’ विमान खरेदी बाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांनी आपल्यातील आक्रमकतेचे दर्शन सत्ताधाऱ्यांना करून दिले होते. गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजप ला घाम फोडला होता. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होम ग्राउंड असलेल्या गुजरात मध्ये त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त लोकप्रियता मिळाली. ज्याच्या जोरावर त्यांनी काँग्रेस च्या जागांमध्ये मागील विधासनभा निवडणुकीपेक्षा वृद्धी करून दाखवली.
