१ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीदरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ताकर अभय योजनेव्दारे क्षेत्रातील थकबाकीदारांना दिलासा
नवी मुंबई, दि. १: मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या महसूलाचा सर्वात मोठा स्त्रोत असून मालमत्ताकर वसूलीकडे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष लक्ष दिले जात आहे. याकरिता मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी सुव्यवस्थित नियोजन केले असून वारंवार आढावा घेत मालमत्ताकर वसूलीला गती दिली आहे.
मालमत्ताकर वसूलीमध्ये थकीत मालमत्ताकराची वसूली हा एक महत्वाचा भाग असून त्यासाठीही नियोजनबध्द प्रयत्न केले जात आहेत. या अनुषंगाने थकित मालमत्ताकराची प्रभावी वसूली करण्याकरिता 1 ते 31 मार्च 2024 या कालावधीत मालमत्ता कर अभय योजना लागू करुन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी थकित मालमत्ताकर धारकांना दिलासा दिलेला आहे. यात विशेष म्हणजे 1 मार्च ते 20 मार्च 2024 या कालावधीत थकित मालमत्ताकराची रक्कम अधिक 25 टक्के शास्ती भरल्यास शास्तीची 75 टक्के रक्कम माफ करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. यापुढील 21 मार्च ते 31 मार्च 2024 या कालावधीत थकित मालमत्ताकराची रक्कम अधिक 50 टक्के शास्ती भरल्यास शास्तीची 50 टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे.
31 मार्च 2024 नंतर मालमत्ताकर अभय योजना शास्ती/व्याज याकरिता लागू राहणार नसून शास्ती/व्याज यामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात येणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावयाची आहे. अभय योजनेस पुढील कालावधीकरिता मुदतवाढही देण्यात येणार नाही असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. अभय योजने अंतर्गत मूळ मालमत्ताकराच्या थकित रक्कमेत कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. अभय योजनेच्या जाहीर केलेल्या कालावधीमध्ये मूळ मालमत्ताकर तसेच सवलती नंतरच्या शास्तीसह येणारी संपूर्ण देय रक्कम भरणा करणे आवश्यक आहे. अंशत: भरलेल्या रक्कमेस अभय योजनेचा लाभ मिळणार नाही याची विशेष नोंद घ्यावयाची आहे.
अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असून ही सुविधा www.nmmc.gov.in या महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच nmmc e-connect या मोबाईल ॲपवर त्याचप्रमाणे नमुंमपा मुख्यालय, सर्व विभाग कार्यालय, सर्व करभरणा केंद्रांवर उपलब्ध आहे. मालमत्ताकराची भरणा करण्याची सुविधा नमुंमपा मुख्यालय, सर्व विभाग कार्यालये व सर्व करभरणा केंद्रांवर रोख/धनादेश/धनाकर्ष याव्दारे करता येईल. दिलेले धनादेश अभय योजनेच्या कालावधीमध्ये कोणत्याही कारणास्तव न वटल्यास अर्जदारास अभय योजनेचा लाभ अनुज्ञेय होणार नाही. रोखीने भरणा करावयाची असल्यास भारतीय रिझर्व्ह बँकेचे या संदर्भातील नियम लागू होतील. तसेच कराचा भरणा महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने डेबीट कार्ड/क्रेडीट कार्ड/इंटरनेट बँकिंग/ एनईएफटी/आरटीजीएस तसेच मोबाईल ॲप nmmc e-connect यावरही करता येईल.
अभय योजना लागू होण्यापूर्वी म्हणजे 1 मार्च 2024 पूर्वी भरणा केलेला मालमत्ताकर तसेच शास्ती/व्याजाच्या रक्कमेच्या संदर्भात कोणतीही सूट मिळणार नाही, तसेच त्यांचा परतावा देखील मिळणार नाही. अभय योजनेचा लाभ घेऊन कराचा भरणा केल्यानंतर या भरणा रक्कमेसंदर्भात कोणत्याही प्राधिकरणापुढे/न्यायाधिकरणापुढे कोणत्याही कारणास्तव दावा दाखल करता येणार नाही. थकित मालमत्ताकर धारकांना 1 मार्चपासून पुढील 20 दिवसात थकित मालमत्ताकर भरणा केल्यास दंडात्मक रक्कमेवर 75 टक्के सवलत तसेच 21 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत दंडात्मक रक्कमेवर 50 टक्के सवलत जाहीर करण्यात आली असून थकित मालमत्ताकर धारकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
