राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना मुदतवाढ
नवी दिल्ली/मुंबई, दि. २९: राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रता प्रकरणी १५ फेब्रुवारीपर्यंत निकाल द्यायला सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुदतवाढ दिली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत व्यस्त असल्याने नार्वेकर यांनी ३ आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती. मात्र आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने २ आठवड्यांची मुदतवाढ दिली. याप्रकरणी ३१ जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग या आठवड्यात निकाल देण्याची शक्यता आहे.
