शहरात उभारले जाणार एयर प्यूरिफायर
मुंबई, दि. ४: बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शनिवारी आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ५२,६१९.०७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सादर केलेला अर्थसंकल्प २०२२-२३ पेक्षा १४.५२ अधिक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे राज्य-नियुक्त प्रशासक असलेले बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यासमोर बजेट सादर करण्यात आले. अर्थसंकल्पीय कागदपत्रांनुसार, “२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ५२,६१९.०७ कोटी रुपये या अर्थसंकल्पीय अंदाजात प्रस्तावित करण्यात आले आहेत, जे २०२२-२३ च्या ४५,९४९.२१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकापेक्षा १४.५२ टक्के अधिक आहे.”
१९८५ नंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या प्रशासकाने बजेट सादर केले आहे. कारण पालिकेच्या नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजीच संपला आहे. BMC ने एक पार्किंग अॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे ज्याच्या आधारे सर्व ३२ नागरी सार्वजनिक पार्किंग लॉट आणि ९१ रस्त्यावरील पार्किंग लॉटचे नियमन केले जाईल. या अॅपमुळे नागरिकांना पार्किंग स्लॉट प्री-बुक करण्यात मदत होईल.
मुंबईतील सातही महापालिका विभागांत प्रत्येकी दोन एअर प्युरिफायर टॉवर उभारण्याचा प्रस्ताव बीएमसीने दिला आहे. यासोबतच शहरातील पाच गजबजलेल्या ठिकाणी एअर प्युरिफायर मशिन बसवण्यात येणार आहेत. या टॉवर्समध्ये धूलिकणाचे प्रदूषण ४५ टक्क्यांनी कमी करण्याची क्षमता असेल आणि ते १ किमीच्या परिघात प्रभावी असतील. प्रत्येक टॉवरसाठी ३.५ कोटी रुपये खर्च येणार आहे. वर्ष २०३० पर्यंत मुंबई शहराला पायाभूत सुविधांनी युक्त विकसित आणि आनंदी शहर बनवण्यासाठी पालिका प्रयत्न करणार असून त्यादृष्टीनं मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नागरिक सुविधा पुरवण्याच्या उद्देशानं अर्थसंकल्प सादर केल्याचं चहल यांनी सांगितलं.
