“खुल्या ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आलेली नाही, याबाबत दंडात्मक कारवाई केली जाणार नाही” – आरोग्यमंत्री राजेश टोपे
या पार्श्वभूमीवर आज टोपे पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर या जिल्ह्यांमधे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ दिसत असून, तिथे सतर्कतेचे उपाय काटेकोरपणे राबवले जातील, असं ते म्हणाले. स्थानिक पातळीवर कोविड प्रादुर्भावात अचानक वाढ होत असल्यानं संबंधित भागात सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं.
कार्यालयं, बस, रेल्वे आणि बंदिस्त ठिकाणी लोकांनी मास्क घालण्याचं आवाहन नुकत्याच झालेल्या बैठकीत महाराष्ट्राच्या कोविड-19 टास्क फोर्सनं केलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. खुल्या ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आलेली नाही, याबाबत दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, मात्र रुग्णसंख्या वाढू नये यादृष्टीनं सर्वांनीच नियमांचं पालन केलं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
