संभाव्य आपात्कालीन परिस्थितीची माहिती कोल्हापुरातील पूरबाधित क्षेत्रातल्या प्रत्येक कुटुंबाला मिळणार मोबाईलवर
कोल्हापूर: कोल्हापूरमधल्या आपात्कालीन परिस्थितीची माहिती आता पूरबाधित क्षेत्रातल्या प्रत्येक कुटुंबाला मोबाईलवर मिळणार आहे. याकरता विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. जिल्हा प्रशासनानं बाधित क्षेत्रांतील आणि गावांमधील माहिती गोळा करण्याचं काम सुरू केलं आहे. या तंत्रज्ञानाद्वारे पूरबाधित प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीचा व्हॉट्सअप क्रमांक प्रशासनाकडे नोंद असेल.
तालुक्यांची गावांची स्वतंत्र यादी असेल. धरणातील पाणीसाठे, नद्यांची पातळी, बंधारे पाण्याखाली गेलेत की नाही याबाबतची आगाऊ माहिती देखील व्हॉट्सअपवर पाठवली जाईल. तसंच या तंत्रज्ञानावरून ऑडियो आणि व्हिडिओ क्लिप पाठवले जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
