नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीत फूट, महाआघाडीने एकमताने भाजपच्या सुजय विखेंना दिला जाहीर पाठिंबा
अहमदनगर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरच्या राजकारणाला वेगळेच वळण आले आहे. नगर तालुक्यातील महाआघाडीने भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
नगरमध्ये शिवसेना, काँग्रेस व महाआघाडीने आज भव्य मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये शिवसेनेसह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी सामील झाले होते. अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीत सुजय विखे पाटील व त्यांच्या कुटुंबाने नगर तालुक्यामध्ये शिवसेना-काँग्रेस आघाडीला मदत केली होती. हीच मदत लक्षात ठेवत काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी भाजपच्या सुजय विखेंना जाहीर पाठिंबा दिला आहे.
काँग्रेसच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नगरमधील एकंदरीत राजकीय परिस्थिती बघता लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना या स्थितीचा पुरेपूर फायदा होणार आहे.
