संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन
मुंबई, दि.८: एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. संपकऱ्यांनी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आंदोलकांच्या भेटीसाठी गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही घेराव घालण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. शांततेच्या मार्गाने संपकऱ्यांशी चर्चा करायला तयार असल्याचं आवाहन त्यांनी केल्यावरही आंदोलक ठाम होते. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आंदोलकांना ताब्यात घेतलं. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच एसटी कामगारांच्या पाठीशी आहे मात्र आंदोलनाचा हा प्रकार निंदनीय आहे, अशा प्रकारे टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
हे आंदोलन अस्थानी आणि अनाठायी असून कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे असं सांगत या हल्ल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं. इतके महिने एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं तरी सरकारने नेहमीच सहानुभुतीची भूमिका घेतली. त्यांच्यावर मेस्मा लावला नाही. अशाप्रकारच्या आंदोलनामुळं काहीही हाती लागत नाही, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. लवकरात लवकर संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं, असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं.
Source-AIR
