शरद पवार यांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलन प्रकरणी अटकेत असलेल्या आंदोलनकर्त्यांच्या कोठडीसाठी युक्तीवाद सुरू
मुंबई, दि.९: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या सुमारे १०४ आंदोलकांसह एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कोठडीबाबत आज मुंबईच्या किला कोर्टात सुनावणी सुरु आहे. दरम्यान सरकारी वकिलांनी अॅड. गुणरत्न सदावर्तें यांना १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी न्यायालयात केली आहे.
पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून, याप्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर तसंच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची सूचना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केली आहे. अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांविरोधात तसंच चिथावणी देणाऱ्यांविरोधात कडक कारवाईच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना दिल्या आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचं, मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितलं आहे.
Photo Courtesy – Adv. Sadawarte FB Page
