उरण तालुक्यातील बोकडवीरा ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत सिडको प्रशासनाची सकारात्मक भूमिका
उरण, दि.२४(विठ्ठल ममताबादे): बोकडविरा ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दि. २५/०१/२०२२ पासून सिडको व रेल्वे संबंधित बोकडविरा महसूल हद्दीतील सर्व कामे ग्रामस्थांतर्फे बंद करून कामबंद आंदोलन केले होते. या कामबंद आंदोलनाची दखल घेऊन बुधवार दि. २३/०२/२०२२ रोजी सिडको भवन, सी. बी. डी. बेलापूर येथे सिडको चे सह.व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, रेल्वेचे चीफ इंजिनिअर (CST) एच. एस. चतुर्वेदी व बोकडवीरा ग्रामस्थांचे प्रतिनिधी मंडळ यांच्यत बैठक संपन्न झाली. या बैठकी मध्ये झालेल्या चर्चेचे मिनिट्स आठवडा भरात लेखी स्वरूपात देण्यात येणार असल्याची माहिती सरपंच मानसी पाटील यांनी दिली आहे. तसेच बोकडवीरा गावा शेजारी होऊ घातलेल्या रेल्वे स्टेशनच्या आराखड्यामध्ये येत असलेली नऊ घरे हि बाधित होणार नाहीत. गावा शेजारी होऊ घातलेल्या रेल्व स्टेशन ला बोकडवीरा रेल्वे स्टेशन नाव देण्यासंदर्भात ताबडतोब प्रस्ताव पाठवण्यात येईल. बोकडवीरा गावातील शेतकऱ्यांना विकसित १२.५% भूखंड वाटप यांच्या १५७ फाईल आहेत. त्यातील ६० फाईल ड्रॉ साठी आहेत. उर्वरित फाईल ची पूर्तता करण्यासाठी ग्रामपंचायती सोबत पत्रव्यवहार केला जाईल. ज्या ग्रामस्थांची जमीन रेल्वे स्टेशन साठी गेली आहे त्यांना रेल्व प्रकल्पग्रस्ताचा दाखला देण्यासबंधी कार्यवाही केली जाईल. गावातील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे शासन निर्देशानुसार नियमित करण्यात येतील. समुद्राच्या भरती च्या वेळी गावात शिरणार्या पाण्याच्या समस्येबाबत पाहणी करून काही दिवसात निर्णय घेतला जाईल. झालेल्या निर्णयांवर कारवाई संबंधी आढावा बैठक घेतली जाईल. असे सिडको प्रशासनातर्फे उपस्थितांना कळविण्यात आले आहे. या मिटिंगसाठी बोकडविरा ग्रामस्थांतर्फे सरपंच मानसी देवेंद्र पाटील, ग्रा. सु. मंडळ अध्यक्ष सूर्यकांत ल. पाटील, JNPT चे ट्रस्टी कॉ. भूषण पाटील, कायदेतज्ज्ञ अँड. विजय पाटील, उरण उत्कर्ष समिती अध्यक्ष गोपाळ पाटील, उपसरपंच शेखर भा. पाटील, ग्रा. पं. सदस्य राकेश व पाटील, कल्पेश वि. पाटील, वंदना दि. पाटील, निर्मला दि. पाटील, माजी सरपंच भगवान ग. पाटील, गणपती देवस्थान ट्रस्टी विरेंद्र ना. पाटील, ग्रा.सु.मं. कार्याध्यक्ष श्रीकांत चं. पाटील, माजी सेक्रेटरी सुनील रा. पाटील, जेष्ठ नागरिक गजानन श. पाटील, सूर्यकांत ज. पाटील, प्रकाश ज. पाटील, मयुरेश का. पाटील, तसेच सह पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण सुनील पाटील तसेच सिडको व रेल्वेचे संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
