पुण्यातील शिवसेना नेत्या मनीषा धारणे यांचे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले विशेष कौतुक
काही वर्षांपूर्वी लग्न शक्यतो ओळखीच्या-नात्यातल्या माणसांमार्फत किंवा विवाह जुळवणार्या संस्थांच्या माध्यमातून जुळवली जात असत. जसजसा काळ बदलत गेला तसतसे नव्या पिढीने लग्न ठरविण्यासाठी मॅट्रिमोनियल साईट्स चा आधार घेतला. या ठिकाणी एक चुटकीसरशी अकाऊंट उघडून आपले प्रोफाईल सर्वांसाठी खुले ठेवता येते. या ठिकाणी बर्यापैकी आपली खाजगी द्यावे लागते व जी सार्वजनिकही होते. आणि नेमकं याच गोष्टीचा फायदा उठवत काही ‘लखोबा’ आला डाव साधतात. पिंपरी चिंचवड पोलिस आणि पुणे स्थित शिवसेना नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या मनीषा धारणे यांनी अशाच एका मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. तीन महिन्यांपूर्वी मनीषा धारणे यांच्याकडे काही महिलांनी मॅट्रिमोनियल साईट्सच्या माध्यमातून दोन तरुणांनी आपली फसवणूक केल्याची माहिती दिली. ज्या दोन भामट्यांनी या महिलांची फसवणूक केली त्यांची मोडस ओप्रेंडी भन्नाटच होती. निशांत रमेशचंद नंदवाना(Rameshchand Nandwana) व विशाल हर्षद शर्मा(Vishal Harshad Sharma) हे दोघे आघाडीच्या मॅट्रिमोनियल साईट्स वर आपली अगदी आकर्षक अशी प्रोफाईल बनवत व यात प्रामुख्याने आपण केंद्र सरकारच्या आस्थापनेत मोठ्या हुद्दयावर असल्याचे नमूद करत. शिवाय या मुलांचे राहणीमानही ऊंची होते. सहाजिकच, महागड्या गाड्या, ऊंची कपडे अशा सार्या देखाव्याला तरुणी झटकन भूलत. यानंतर काही भेटींतच मग दोघांमध्ये आर्थिक व्यवहारांना सुरुवात होई व मग अखेर ही मंडळी आपला खरा रंग दाखवत या तरुणींची आर्थिक व शारीरिक-भावनिक फसवणूक करत.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनूसार शिवसेना नेत्या मनीषा धारणे या जेव्हा पीडित महिलांना त्यांच्याकडे घेऊन आल्या त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता या प्रकरणाचा तपास वाकड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्याकडे दिला. डॉ. मुगळीकर व टीम ने तांत्रिक तपासाच्या आधारे विविध राज्यांत आपली पथकं पाठवली व आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा केले. या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे तब्बल ७५ लाख रुपयांची रोकड तसेच ५० हून अधिक बनावट ओळखपत्र व मोठ्या संख्येने मोबाईल फोन आढळले. तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी पोलिसांच्या निदर्शनास आल्या. या दोघा लाखोबांनी आतापर्यंत देशभरातील २५० मुलींची फसवणूक केली असून त्यात सर्वात जास्त बेंगळुरू च्या १४२ मुलींचा समावेश असून त्याखालोखाल पुण्यातील ९१ व दिल्ली गुरगाव येथील २२ मुलींची फसवणूक केली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून ही मंडळी योग्य वेळी आपल्या आर्थिक अडचणींचा पाढा या मुलींसामोर मांडायचे. प्रेमात आकंठ बुडालेल्या या पीडित मुलींकडून मग हे भामटे थोडे-थोडके नव्हे तर लाखो रुपये उकळत. एका नामांकित कंपनीत एचआर असलेल्या एका तरुणीकडून तर निशांत नंदवाना या आरोपीने जवळपास १३ लाख रुपये उकळले आहेत. शिवाय शारीरिक फसवणूक केली ती वेगळी जिची किंमत करता येणार नाही.

अनेकदा अशा प्रकरणांत फसवणूक झालेल्या पीडिता समाजात आपली बदनामी होईल या भीतीपोटी समोर येण्याचं धारिष्ट्य दाखवत नाहीत. परंतू, या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या मनीषा धारणे यांनी या मुलींना धीर देत योग्य वेळेत पोलिसांची मदत मिळविली व यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिवसरात्र एक करत प्रकरण तडीस नेले. अशा घटना या पुढे कोणासोबत घडू नयेत यासाठी मुलींनी सतर्क राहण्याचे, तसेच मॅट्रिमोनियल साईट्सच्या माध्यमातून लग्न जुळवताना सर्व बाबींची खातरजमा करतच पुढे जाण्याचे आवाहन आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.
