साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात शिवसेना ‘या’ नेत्याला उमेदवारी देण्याची शक्यता
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार नरेंद्र पाटील हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेकडून नरेंद्र पाटलांना उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात येणार आहे. कोल्हापुरात आयोजित युतीच्या मेळाव्यात नरेंद्र पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
आज(२२ मार्च) नरेंद्र पाटील मातोश्रीवर येणार असून ते उद्धव ठाकरे यांना भेटून पक्ष प्रवेशाबदल चर्चा करणार आहेत. सध्या ते अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडाळाचे अध्यक्ष आहेत.
सातारा मतदारसंघातून आधी भाजपकडून माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र आता नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आहे. त्यामुळे साताऱ्यात नरेंद्र पाटील यांना जास्त मतं मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याच कारणास्तव राष्ट्रवादी पक्षाचे उदयनराजे विरोधात शिवसेनेकडून नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली जाणार आहे.
