पारदर्शक! गुजरात उच्च न्यायालय होणार देशातील पहिले थेट प्रक्षेपण करणारे न्यायालय
गुजरात, दि.१५: येत्या १७ जुलैपासून गुजरात उच्च न्यायालयात होणाऱ्या विविध प्रकरणांच्या सुनावणींचे थेट प्रसारण केले जाणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले आहे. जे न्यायाधीश थेट प्रसारणास इच्छुक असतील त्यांच्यासमोर येणाऱ्या सर्व प्रकरणांच्या सुनावणीचेच प्रसारण केले जाणार असल्याचेही गुजरात उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे न्यायालयीन सुनावणीच्या कामकाजाचे थेट प्रसारण करणारे गुजरात हे देशातले पहिले उच्च न्यायालय ठरणार आहे.
या पूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०२० पासून मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली पहिल्या न्यायालयात चालणाऱ्या सुनावणीचे यूट्यूबवरून थेट प्रसारण करण्यास सुरुवात केली होती. या प्रयोगाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने उच्च न्यायालयाने इतर इच्छुक पीठांपुढील सुनावणीचेही थेट प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे.
Source – AIR
