चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून ४५ वर्षांवरील नागरिकांचे १००% कोरोना लसीकरण पूर्ण करा
चंद्रपूर, दि.२१: चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील राजगड ग्रामपंचायतीनं ४५ वर्षावरील १०० टक्के नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण केलं असून अशी कामगिरी करणारी राजगड ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
लसीकरणाबाबत विशेषतः ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राजगड ग्रामपंचायत मात्र यासाठी अपवाद ठरली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व १५ तालुकास्तरावर सरपंचांचे व्हाट्सॲप ग्रुप तयार करून लसीकरणाबाबत थेट सरपंचांशी संवाद साधला. तसंच गट विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लसींचे डोस कमीतकमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील, याबाबत नियोजन केलं. राजगड गावानं या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद दिला आणि लसीकरणात आदर्श कामगिरी करून दाखवली आहे.
