सुजयच्या विरोधात राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही – राधाकृष्ण विखे-पाटील
सुजय विखे यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रथमच विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली भूमिका माडंली.
भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सुजयचा वैयक्तिक होता. त्याने कोणताच निर्णय माझ्याशी चर्चा करून घेतलेला नाही. असं असलं तरी त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार मी करणार नाही,’ असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज स्पष्ट केलं. तसंच, विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून घेईन असेही त्यांनी सांगितले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सुजय भाजपमध्ये जाण्यास राष्ट्रवादी काँग्रेसची आडमुठी भूमिका जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी अप्रत्यक्षरित्या केला. आघाडीला गालबोट लागेल असं वक्तव्य मी आजवर कधीच केलेलं नाही.
शरद पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आपल्या वडिलांबद्दल जे काही विधान केले आहे त्यामुळे मला दु:ख झाले आहे, हयात नसणाऱ्या व्यक्ती बदल ज्येष्ठ नेत्याने त्यावर टीका करणे हि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, असे राधाकृष्ण विखे म्हणाले.
