म्युकरमायकोसीसवरील ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शनसाठी राज्य सरकारनं काढली जागतिक निविदा
मुंबई, दि.२५: राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेलं ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारने जागतिक निविदा काढली आहे. त्यामाध्यमातून जूनच्या पहिल्या आठवडयात या इंजेक्शनच्या ६० हजार कुप्या आंतरराष्ट्रीयस्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. मंत्रालयात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आणि म्युकरमायकोसीस आजाराबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर माध्यमांना माहिती देतांना आरोग्यमंत्री बोलत होते.
महाराष्ट्रात सध्या म्युकरमायकोसीसचे २२४५ रुग्ण आहेत.महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून त्यासाठी राज्यभरात १३१ रुग्णालयं नोटफाईड करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा समावेश आहे. सध्या राज्यात सुमारे २२०० रुग्णांपैकी १००७ रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचार सुरू असल्याचं ते म्हणाले.
राज्याच्या सरासरी एवढ्या पॉझीटिव्हीटी दरापेक्षा १८ जिल्ह्यांतील पॉझीटिव्हीटी दर जास्त आहे तिथं गृह विलगीकरण बंद करून कोविड केअर सेंटरमध्ये तशी सुविधा निर्माण करण्याची सूचना देण्यात आली आहे. १५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी २५ टक्के निधी हा कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
ग्रामीण भागात कोरोनाची साथ रोखतानाच आता आशा स्वयंसेविकांना रॅपीड ॲण्टीजेन चाचणी आणि स्वयंनिदान चाचणी करण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
