२२७ प्रभागात किमान एक लसीकरण केंद्र
मुंबई, दि. २८: १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणासाठी मुंबई महानगर पालिका सज्ज असल्याचं आयुक्त इक्बाल चहल यांनी आज सांगितलं. यासाठी महापालिकेच्या २२७ प्रभागात किमान एक लसीकरण केंद्र सुरु करण्यात य़ेणार असून त्याव्यतिरिक्त मुंबई मनपा क्षेत्रात १०० खाजगी केंद्र कार्यान्वीत होतील. खाजगी उद्योग, अस्थापना, निवासी संकुल यांनी खाजगी रुग्णालयाशी सामंजस्य करार केल्यास त्यांच्यामार्फत विशेष लसीकरण मोहिम राबवता येणं शक्य आहे, असंही ते म्हणाले. राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत आज होणाऱ्या धोरणात्मक निर्णयानुसार मुंबई महापालिका क्षेत्रात लसीकरण होईल, असंही त्यांनी सांगितलं.
मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक लसीकरण मोहीम येत्या १ मे पासून सुरु होईल, त्यात काहीही दिरंगाई होणार नाही असं आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. एका महिन्यात देण्यासाठी महानगरपालिकेने राज्यशासनाकडे ३० लाख मात्रांची मागणी केली आहे. या मोहिमेत १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लस देण्यात येईल तसंच महानगरपालिका आणखी ३०० केंद्र सुरु करणार आहे,अशी माहिती त्यांनी दिली.
सरकारी आकडेवारी नुसार १८ वर्षापेक्षा जास्त वयाची लोकसंख्या ८० लाख असून त्यांच्याकरता १ कोटी ६० लाख मात्रांची आवश्यकता आहे. त्यातल्या २२ लाख मात्रा देऊन झाल्या आहेत. रुग्णसंख्या लक्षात घेऊन महानगरपालिका शहरातल्या १२ रुग्णालयांमधे मिळून १६ ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणार आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे त्याचा कार्यभार आहे. या प्रकल्पातून दररोज ४३ मेट्रिक टन प्राणवायूची निर्मिती होईल.
