उरण येथील पीडिताची फसवणूक करणाऱ्याला लवकरात लवकर गजाआड करण्याची केली विनंती
मुंबई, दि. १४: सध्याच्या काळात लोकांना टोप्या लावण्यासाठी सायबर भामटे काय काय शकला लढवतील सांगता येत नाही. उरण येथील पंकज धारगळकर यांनाही एका भामट्याने चक्क शिवसेना नेते नितीन नांदगावकर(Nitin Nandgaonkar) यांच्या नावाचा आधार घेत १० हजार रुपयांना चुना लावला.
११ मार्च २०२१ रोजी पंकज धारगळकर(वय ५८) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने दिवा येथील बिल्डर महेश पटेल याने फ्लॅट देण्याच्या बहाण्याने आपली ३८ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार शिवसेना भवन, दादर येथे दिली होती. यानंतर जवळपास महिन्याभराच्या अवकाशाने दि. ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता धारगळकर यांना प्रमोद महाजन नावाने एक फोन आला. सदर इसमाने आपण दादर येथील शिवसेना भवन(Shivsena Bhavan) येथून बोलत असल्याचे सांगितले. तसेच तो म्हणाला की तुमचे जे पैसे साई कनिष्क बिल्डर कडे अडकले आहेत ते परत मिळवून देऊ; फक्त तुम्हाला याकामी प्रोसेसिंग फी पोटी १० हजार रुपये द्यावे लागतील. त्याच्या बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवत पंकज धारगळकर यांनी पवन शरद पाटील या इसमाच्या खात्यावर फोन पे द्वारे पैसे ट्रान्सफर केले. यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी या भामट्याने त्यांना सांगितले की आमचा माणूस २०-२० लाखांचे दोन डी. डी. घेऊन बिल्डर महेश पटेल कडून निघाला असून ७.३० पर्यंत तो तुमच्याकडे पोहोचेल. पण तसे काही घडले नाही.
अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर धारगळकर यांनी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांना आपल्याला सेना भावनातून कॉल आला व आपण १० हजार रुपये प्रोसेसिंग फी भरली असल्याचे मेसेजद्वारे सांगितले. यावर नितीन नांदगावकर म्हणाले की गेले आठवडाभर शिवसेना भवन बंद असून प्रमोद महाजन नावाची कोणतीही व्यक्ती इथे कामाला नाही. शिवाय अशा प्रकारे कोणत्याही तक्रारीसाठी कधीही पैसे आकारले जात नाहीत. याउपर नांदगावकर यांनी पंकज यांस या प्रकरणी तात्काळ पोलीस स्थानकात तक्रार करण्यास सांगितले व तशी रितसर तक्रारही धारगळकर यांनी उरण पोलीस स्थानकात दाखल केली. पोलीस पुढील तपास करत असल्याचे कळते.

या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम(Maharashtra varta) च्या टीम ने शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांच्याशी फोनद्वारे वार्तालाप केला. यावेळी ते म्हणाले की दर आठवड्याच्या बुधवारी व गुरुवारी, दुपारी १२ ते २ या वेळात शिवसेना भवन, दादर येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध प्रकारे फसवणूक झालेले, घरगुती हिंसाचाराने त्रस्त असे पिचलेले नागरिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे तक्रार पत्र घेऊन माझ्या भेटीला येतात. या साऱ्यांचं गाऱ्हाणं मी इतर तक्रारदारांसमोरच ऐकतो. अशा वेळी सर्व विषय हे उघडच असतात, सर्वांसमोर चर्चिले जातात. त्यातून कोणा ठगाने हे विषय ऐकून पंकज धारगळकर यांना संपर्क केला असण्याची दाट शक्यता आहे.”
“काही महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारे माझ्या अधिकृत फेसबुक पेजद्वारे पीडितांशी संपर्क करून किरण महाडिक नावाच्या ठगाने आर्थिक फसवणूक केली होती व या प्रकरणात पोलीसांनी त्याच्यावर अटकेची कारवाईही केली होती.”
पुढे ते म्हणाले की, “या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी लवकरात लवकर या ठगांचा शोध घेत त्यांना गजाआड करावे. तसंच माझी एक विनंती राहील की आरोपी सापडल्या सापडल्या मला त्याठिकाणी बोलवावं. मला त्यांना विशेष प्रसाद देण्याची फार इच्छा आहे. कारण अशा प्रकारे आधीच त्रस्त असलेल्या लोकांना फसवणाऱ्यांना फक्त जेलवारी घडवून काही साध्य होणार नाही. त्यांची धिंडच काढली पाहिजे.”
“मुळात गेले अनेक वर्ष आर्थिक घोटाळ्यांपासून सावध राहण्यासाठी लोकांचं प्रबोधन करूनही अद्याप लोकं कोणतीही खातरजमा न करता फसतात हे फार निराशाजनक आहे.”
शिवसेना नेते नितीन नांदगावकर सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याच्या आपल्या ‘अनोख्या शैलीसाठी’ प्रसिद्ध आहेत. ती शैली वादग्रस्त असली तरी त्याचा परिणाम तात्काळ होतो व नांदगावकर यांच्या एका फोननेच समोरचा घोटाळेबाज आपली शस्त्र म्यान करतो. या प्रकरणी नवी मुंबई पोलीसांनी आरोपींना पकडण्यासाठी आपली सायबर क्राईम यंत्रणा कामाला लावली असल्याचे कळते.
मुळात गेले अनेक वर्ष आर्थिक घोटाळ्यांपासून सावध राहण्यासाठी लोकांचं प्रबोधन करूनही अद्याप लोकं कोणतीही खातरजमा न करता फसतात हे फार निराशाजनक आहे.
खालील लिंकवर क्लीक करा आणि आम्हाला न चुकता YOUTUBE Channel || Facebook || Twitter || INSTARAM ला SUBSCRIBE | LIKE | FOLLOW करा
