आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज
२०२१ मध्ये भारताचा आर्थिक विकासाचा दर साडे अकरा टक्के राहील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणे निधीने व्यक्त केला आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, दोन आकडी आर्थिक विकास दर गाठू शकणारा भारत, हा जगातील एकमेव देश ठरण्याची शक्यताही नाणेनिधीने वर्तवली आहे. यामुळे जगात सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून जगात भारताची ओळख पुन्हा निर्माण होऊ शकते.
नाणेनिधीने जाहीर केलेल्या अहवालानुसार २०२१ मध्ये भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर चीनचा आर्थिक विकास दर ८ पूर्णांक १, त्यानंतर स्पेनचा ५ पूर्णांक ९ आणि फ्रान्सचा विकास दर ५ पूर्णांक ५ दशांश टक्के राहू शकेल असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
२०२२ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ६ पूर्णांक ८ तर चीनची ५ पूर्णांक ६ दराने वाढण्याचा अंदाजही नाणेनिधीने व्यक्त केला आहे.
भारताने कोरोना महामारी आणि त्यामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मोठी निर्णायक पावले उचलली असल्याचे गौरवोद्गार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालीना जोर्जीवा यांनी जानेवारीच्या सुरवातीलाच काढले केले होते.
