राज्यात १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला होणार
राज्यात १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होत आहेत. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची ३० डिसेंबर ही शेवटची तारीख होती. राज्यभरातील जवळपास सर्वच ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी हे अर्ज भरण्यासाठी संबंधित तहसील कार्यालयांमध्ये गर्दी केल्याचं दृश्य दिसून आलं. विविध जिल्ह्यांतून दाखल झालेल्या अर्जांसंदर्भातली आकडेवारी काल हाती आली असली तरी काल छाननी पूर्ण झाली असूनही अजून काही जिल्हयातली दाखल अर्जांचीच आकडेवारी मिळालेली नाही.
राज्याची एकत्रित आकडेवारी राज्य निवडणुक आयोगाच्या कार्यालयाकडूनही उपलब्ध होऊ शकली नाही. काल अर्जांची छाननी झाली असून चार जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. याचदिवशी प्रचारचिन्हांचं वाटपही होणार आहे. मतदान १५ जानेवारीला तर मतमोजणी १८ जानेवारीला होणार आहे.
