सात वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या भामा आसखेड योजनेचे काम शंभर टक्के पुर्ण
पुणे: गेल्या सात वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या भामा आसखेड योजनेचे काम शनिवारी मध्यरात्री शंभर टक्के पुर्ण झाले आहे. येत्या १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष पाणी पुरवठा चाचणीला सुरवात होणार असून त्यानंतर हे पाणी नागरिकांच्या घरात पोहोचणार असल्याची माहिती वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी काल दिली.
पुणे शहराच्या पूर्व भागातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेकडून भामा आसखेड पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आली. या योजनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारकडून ३८० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता.
२०१३ साली सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे काम डिसेंबर २०१७ ला पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह विविध ठिकाणी जलवाहिनीचे काम अडवले गेल्याने या योजनेचे काम बंद होते.
अनेकदा पोलीस बंदोबस्त तैनात करून प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याची वेळ महापालिकेवर आली. अखेर आता काम पूर्ण झाले असले तरी प्रकल्पाला विलंब झाल्याने खर्चात सुमारे शंभर कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
दरम्यानच्या काळात वाढत्या लोकसंख्येने पाण्याची गरजही आणखी वाढली आहे. त्यामुळे ही योजना पूर्ण होऊनही पुणेकरांची तहान भागवण्यासाठी पुन्हा एकदा पाण्याचे नव्याने नियोजन करावे लागणार आहे.
Source – AIR
