शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावरील ‘ईडी’ च्या धाडीवरून पेटलं राज्यातील राजकारण
मुंबई, दि.२४: शिवसेना आमदार व प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर व कार्यालयावर सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ‘ईडी’ च्या पथकाने आज सकाळी ८ च्या सुमारास धाड टाकली. यानंतर सरनाईक यांचे दोन्ही पुत्र विहंग व पूर्वेश यांच्या घरांवरही ईडी च्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. प्रताप सरनाईक सध्या परदेशात असून याच वेळी नेमकी धाड पडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
गृहसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणाचा विषय प्रताप सरनाईक यांनी लावून धरला होता यावेळी त्यांनी अर्णब गोस्वामींवरही टीका केली होती. आजच्या ईडी कारवाईनंतर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी भाजपवर विशेषतः केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, “हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्ही सुरुवात केली, शेवटी आम्ही करू”
प्रताप सरनाईक हे बांधकाम व्यवसायात असून त्यांचे ठाण्यात हॉटेल विहंग नावाचे एक तारांकित हॉटेल आहे.
