अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई, दि. १८: मुंबई व ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून सर्वसाधारण दर्जाचे अन्नधान्य वितरित करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. असे असताना सुद्धा काही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी काही स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असल्याची दखल अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेऊन यासंदर्भात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्या अनुषंगाने दक्षता पथकामार्फत या दुकानाची अन्नधान्याच्या दर्जाबाबतची तसेच इतर बाबींची संपूर्ण तपासणी केली असता आढळून आलेल्या त्रुटीसंदर्भात जीवनावश्यक वस्तु कायदा, १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
अधिकृत शिधावाटप दकान क्र. 42 ग/298 या दुकानाच्या संपूर्ण तपासणीनंतर तपासणीत अनुक्रमे 514 किलो तांदूळ, 2838 किलो गहू, तूरडाळ 116 किलो आणि चणाडाळ 112 किलो या शिधावस्तूंचा साठा जप्त करण्यात आला. गुन्ह्यामध्ये एकूण रुपये 1,04,287/- इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मालवणी पोलिस स्टेशन, मुंबई येथे गुन्हा नोंद क्र. 121/2020 अन्वये दि. 16/9/2020 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिकृत शिधावाटप दुकान क्र. 34 ई /108 या दुकानाच्या संपूर्ण तपासणी नंतर तपासणीत अनुक्रमे ४८७ किलो तांदूळ, ०९ किलो गहू आणि चणाडाळ ०४ किलो या शिधावस्तूंचा साठा जप्त करण्यात आला. गुन्हृयामध्ये एकूण रुपये १८,६७२.०५/- इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून घाटकोपर पोलिस स्टेशन, मुंबई येथे गुन्हा नोंद क्र. ७५/२०२० अन्वये दि. ११/०९/२०२० रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
याद्वारे सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, कोणीही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाचे अन्न वितरीत करण्याचा प्रयत्न करीत असल्यास कार्यालयाच्या हेल्पलाईन क्र. 022-22852814 तसेच ई-मेल आयडी dycor.ho-mum@gov.in यावर संपर्क साधावा जेणेकरुन अशा अधिकृत शिधावाटप दुकानदारांविरुद्ध कारवाई करणे शक्य होईल. असे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
