जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना उत्तर प्रदेशमधून अटक
लखनौ: जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूरजवळच्या देवबंद येथून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. आबिक अहमद मलिक आणि शाहनवाझ अशी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांची नावं आहेत.
शाहनवाझ हा मुळचा जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथील रहिवासी असून तो जैश-ए-मोहम्मदच्या संघटनेमध्ये काश्मिरी तरुणांना भरती करतो, असा त्याच्यावर आरोप आहे. या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली असल्याचे यूपीचे पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा कंबर कसून कामाला लागली आहे. तसेच दहशतवाद विरोध पथकं सर्व राज्यात जोरदार तपास करत आहे.
