“सरकार सध्या आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचं निराकरण कसं करणार आहे?”; सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरेंचा सवाल
मुंबई: आज मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. याबैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप सह मनसेनेही हजेरी लावली होती.
यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही सूचना राज्य सरकारला केल्या. ते म्हणाले की, “शासकीय कर्मचारी, महापालिका कर्मचारी, सफाई कामगार ह्यांना सुरक्षा साधनं अपुरी पडत आहेत, त्यांना मुबलक सुरक्षा साहित्य पुरविण्यात यावं.”
पुढे त्यांनी सरकारला कोरोनाबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजनां बाबत काही प्रश्नही विचारले. ते म्हणाले की “सरकारचा ‘टाळेबंदी शिथिलता कृती आराखडा’ (Lock-down Exit Plan) काय आहे? सरकार सध्या आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचं निराकरण कसं करणार आहे? कारण लस मिळेपर्यंत टाळेबंदी हा काही उपाय नाही.”
