“कामगारांनी कामावर यायचे बंद केले तर?” कोरोना चाचणीची मागणी करणाऱ्या नवी मुंबईतील कंत्राटी कामगारांचा पालिकेला सवाल
नवी मुंबई: नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन ने नवी मुंबई महानगरपालिकेजवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांची मोफत कोरोना चाचणी करण्याची मागणी केली आहे. सध्या नवी मुंबई महानगरपालीकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये व त्यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे कंत्राटी कर्मचारी सध्या या कठीण काळात स्वतःच्या जीवाची एक प्रकारे बाजी लावून स्वतःचे कर्तव्य बजावत आहेत. यापूर्वी युनियन ने वेतन कपातही न करण्याबाबत महापालिकेला निवेदन दिले होते.
आयुक्तांना संबोधून या पत्रात युनियन चे सरचिटणीस ऍड. सुरेश ठाकूर म्हणतात की, “आम्ही कामगारांच्या वतीने आपणांस सोशल मिडीया आणि ट्वीटर च्या माध्यमातून नवी मुंबई महानगर पालिकेच्या सर्व अत्यावश्यक सेवेतील कंत्राटी कामगारांची लवकरात लवकर मोफत कोरोना टेस्ट करण्यात यावी तसेच कोणत्याही कामगारांचे वेतन कपात करु नयेत अशीही मागणी आपणाकडे केलेली होती.सदर मागण्यांबाबत आपण योग्य तो निर्णय, खबरदारी न घेतल्याने नवी मुंबईतील करावे येथील एका सफाई कामगाराला कोरोना ची लागण झाल्याचे समोर आले आहे. आता तो कामगार इतर किती जणांच्या संपर्कात आला असेल ते त्यालाच माहित.. पण ह्यामुळे इतर त्याचे सहकारी देखील ह्या व्हायरसला बळी पडतील..तरी आम्ही पुन्हा एकदा कामगारां च्या वतीने मागणी करीत आहोत. कामगारांमध्ये नाराजीची भावना निर्माण होऊन कामगारांनी कामावर यायचे बंद केले तर कायदा सुव्यवस्था बिघडण्याची, नागरिकांचीच सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेऊन येत्या ८ दिवसात सर्व कंत्राटी कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात यावी.”
याच सोबत पुढील काही मागण्याही युनियन मार्फत करण्यात आल्या आहेत.
१) प्रत्येक कंत्राटी कामगारांचा ५० लाखांचा कामगार विमा त्वरीत उतरवणे .
२) ३०० रु. प्रतिदिन प्रमाणे सध्या कार्यरत कंत्राटी कामगारांना प्रोत्साहन भत्ता लवकरात लवकर
देण्यात यावा.
३) पाणीपुरवठा /मलनि:सारण / घंटागाडी /मलेरिया /साफ सफाई इ.कामगारांना कामाच्या ठिकाणी अन्नधान्याचा मुबलक पुरवठा करण्यात यावा.
सध्या व येत्या काळातही आरोग्य व स्वच्छता विभागात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती करावी लागणार आहे. अशा वेळी जर आहेत त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना जर योग्य सोयी सुविधा दिल्या नाहीत तर नवी माणसे कामावर येतील का या बाबीचा विचार प्रशासनाने नक्कीच करावा. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ या प्रकरणी योग्य ती दखल घेतील ही अपेक्षा.
टीप: पत्रात नमूद करावे येथील कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
निवेदन पत्र

