सत्तेची आस लावून घेण्यात अर्थ नाही – धनंजय मुंडे
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वर्ध्यामध्ये पहिली जाहीर सभा घेतली. यावेळी मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर टीका केली.
आदरणीय शरद पवार यांच्या कुटूंबाची आणि राष्ट्रवादीची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करू नये. गडकरी यांनी पंतप्रधानांबद्दल काही दिवसांपूर्वी काय वक्तव्य केले हे सर्वज्ञात आहे. आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची पंतप्रधानांनी काय स्थिती करून ठेवली आहे याकडे प्रथम लक्ष द्यावे, असे ट्विट करत धनंजय मुंडे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये मुंडे म्हणतात की, वर्धा सभेतील कमी गर्दीने मोदींचा तापलेला माथा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, हे नक्की. २०१४ साली दिलेल्या आश्वासनांचा कित्ता गिरवून सत्तेची आस लावून घेण्यात अर्थ नाही हे त्यांनी जाणावे. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यांचा चढता आलेख पाहता कुंभकर्ण कोण ते स्पष्टच आहे.
