राजकारण हे स्वतःच्या प्रगतीसाठी नसून जनतेच्या गोरगरिबांची कामे करण्यासाठी असतं : श्रीनिवास वनगा
पालघर: शनिवारी पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पालघर येथे सभा झाली. यावेळी जे तुम्हाला पाहिजे आहे ते सर्व शिवसेना-भाजप तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन उद्धव यांनी पालघरवासीयांना दिले.
काही दिवसांपूर्वीच मी पालघर मतदार संघात येऊन गेलो. इथल्या माता-भगिनींशी मी बोललो होतो की इथली गुंडगिरी मी बंद करेन. त्याच माझ्या माता-भगिनींना मी सांगू इच्छितो की, तुमच्यावर कोणी दादागिरी करत असेल तर या गल्लीबोळातल्या गुंडांची मुजोरी आम्ही मोडून काढू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना ही नेहमी काम करणार्याच्या आणि मर्दांच्या मागे असते. जे कोणी राज्यातील गोर गरिबांना छळेल त्याला कायद्याचा फटका आमचे सरकार देणार असा इशाराही त्यांनी दिला.
श्रीनिवास आणि राजेंद्र गावित दोघेही प्रामाणिकपणे काम करणारी माणसे पालघर जिल्ह्याला मिळालेली आहेत. श्रीनिवास यांनी सांगितले की मला अजून थोडा वेळ हवा आहे तूर्तास मला काम करायचे आहे. मी श्रीनिवासला लवकरच विधानसभेत पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अडीअडचणीत रात्री कधीही दार ठोठावले तरीही आपल्या साठी उभा राहणारा खासदार आपल्याकडे आहे. पालघर जिल्ह्यात आपल्या भगव्याची परंपरा ही अशीच कायम ठेवायची आहे. यासाठी सर्वांनी राजेंद्र गावित यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
राजेंद्र गावित
पालघर मतदारसंघात पासपोर्ट कार्यालय नव्हते त्यासाठी वारंवार आपण सुषमा स्वराज यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत बोलणी करून लवकरच जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय चालू करणार आहोत, अशी ग्वाही पालघर जिल्ह्याचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी दिली. या आधीच्या खासदारांनी कधीही मतदारसंघातले प्रश्न संसदेत मांडले नाही, असे म्हणत त्यांनी आघाडीवर निशाणा साधला. तुमच्या प्रश्नांसाठी समस्येसाठी जिल्ह्यातील सामान्य माणूस माझ्याकडे कधीही संपर्क साधू शकतो. जिल्ह्यातील भू-माफियांना आपल्याला एकत्र येऊन हद्दपार करायचे आहे, असेही गावित यावेळी म्हणाले.
श्रीनिवास वनगा
राजकीय घराण्यातल्या असलो तरीदेखील मी राजकारणात तसा नवखा आहे म्हणून मी स्वतः उद्धव साहेबांना सांगितले की यावेळेस मी निवडणूक लढत नाही. ही विनंती उद्धव साहेबांनी माझी मान्य केली.
राजकारण हे स्वतःच्या प्रगतीसाठी नसून जनतेच्या गोरगरिबांची कामे करण्यासाठी असतं हेच काम माझ्या वडिलांनी केलं. मीसुद्धा माझ्या वडिलांसारखा इमानदार होणार आहे, असे श्रीनिवास वनगा म्हणाले.
काँग्रेसला पन्नास वर्षात जमले नाही ते नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात करून दाखवले आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेसच्या कामावर ताशेरे ओढले. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला या येथे काम करायचे आहे. युतीने आपल्याला एक सक्षम उमेदवार दिलेला आहे. त्यांना बहुसंख्या मतांनी निवडून द्या, असे देखील वनगा म्हणाले.
