मुंबईत दूध २ रुपयांनी महागणार, १ एप्रिलपासून नवे दर लागू
मुंबई: सध्या आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना चालू आहे. पण नवीन आर्थिक वर्षात अनेक वस्तूंच्या दरवाढीचे सत्र सुरू होण्याची चिन्हे आहेत. मुंबईत १ एप्रिलपासून दुधाच्या दरात लिटरमागे दोन ते तीन रुपये वाढ होणार आहे. मुंबईपाठोपाठ राज्यातील इतर शहरांमध्येही १ मेपासून दूध दरवाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणांतर्गत येणार्या शहरांमध्ये दररोज म्हैस व गायीच्या ६० ते ६५ लाख लिटर दुधाची आवश्यकता आहे. तसेच मुंबई आणि ठाणे परिसरातील १७०० दूध डेरी येतात. पुणे, सांगली, कोल्हापूर, जळगाव, बीड, अहमदनगर या जिल्ह्यातील दूध संघ हा पुरवठा करतात. राज्याच्या विविध सहकारी दूध संघाकडून मुंबईत दररोज गायीचे २८ लाख लिटर, तर म्हशीचे १७ लाख लिटर दूध आणले जाते. १० लाख लिटर दूध गुजरात व मध्य प्रदेशमधून येते तर मुंबईतील तबेलेवाले दररोज सात लाख लिटर दूधाचा पुरवठा करतात.
घाऊक बाजारात म्हशीचे दूध ६४ रुपये प्रति लिटर ऐवजी आता ६६ रुपये प्रति लिटर मोजावे लागतील. तर किरकोळ विक्री बाजारात सध्या ७० ते ७५ रुपये प्रति लिटर दराने दूध विकले जाते. त्यामध्ये २ रुपयांची वाढ होईल. १ एप्रिल २०१९ पासून ही वाढ लागू करण्यात येईल, अशी माहिती मुंबई दूध उत्पादन मंडळाकडून देण्यात आली आहे.
थेट गोठ्यांमधून मिळणाऱ्या म्हशीच्या खुल्या दुधाच्या दरात वाढ होणार असली तरी म्हशीचे पिशवी बंद दूध अमुल, गोकुळ, गोवर्धन आणि त्यासारखे अन्य ब्रँडच्या दुधाच्या किमतीत कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे.
