पार्थच्या प्रचारासाठी अजित पवार व सुनेत्रा पवार यांचा पनवेलमध्ये मुक्काम
पनवेल: मावळ मतदारसंघातून पार्थला निवडून आण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंबच नात्यागोत्यासह प्रचारासाठी उतरले आहे. पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी आज पार्थचे वडील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार हे पनवेलमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत.
राष्ट्रवादी व पवार कुटुंबासाठी मावळमधील निवडणूक प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. या मतदारसंघातील निकालात पनवेलमधील मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने पार्थच्या प्रचारासाठी अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी सध्या पनवेलमध्येच मुक्काम ठोकला आहे.
पार्थ पवार यांची आई सुनेत्रा पवार याही प्रचारात उतरल्या आहेत. विविध पक्षांच्या बचत गटातील महिलांशी संपर्क साधून त्यांना पार्थच्या चांगल्या कामाचे दाखले देत त्याला निवडून देण्यासाठीचे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले आहे. तर एका बाजूला अजित पवार हे भाजप मधील काही गटांशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मवाळमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने थेट अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांना रिंगणात उतरवल्याने या मतदारसंघातील चुरस वाढली असून मावळच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
