…तर मी घरी बसलो असतो : धनंजय मुंडे
पुणे: देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात देशात अनेक कारगील तसेच छोटी मोठी युद्ध झाली. परंतु, त्यांनी कधी जवानांच्या शौर्यावर किंवा त्यांच्या बलिदानावर मतं मागितली नाहीत. मात्र मोदीजी तुम्ही पुलवामामधील शहीद जवांनांच्या बलिदानावर उघडपणे राजकारण करत आहेत. राजकारण जमत नसेल तर घरी बसा, असा शब्दात विरोधपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली आहे.
२०१९ च्या निवडणुकीत तुम्ही देशाचे चौकीदार असल्याचे म्हणत आहे. पण लोक तुम्हाला ‘चौकीदार चोर’ या नावाने ओळखू लागले आहेत. देशाचा विकास, जीएसटी, उज्वल गॅस योजना, मेक इन इंडिया या योजनांच काय झालं याविषयी तुम्ही बोलणे टाळत आहात. यंदाच्या निवडणुकीत तुमचा विकास हरवला असून, देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानावर मत मागण्याची अत्यंत वाईट वेळ तुमच्यावर आली आहे असे धनंजय मुंडे म्हणाले.
मोदीजी तुमच्या जागी मी असतो तर घरी बसलो असतो, परंतु, शहीदांच्या नावे मतं मागितले नसते, असा घणघणात टोलाही मुंडे यांनी यावेळी लगावला.
विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि भाजपा नेत्यांनी एकमेकांवर टीका केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांची अफजलखानशी तुलना केली होती. याच टीकेचा फायदा घेत धनंजय मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. गुजरातमध्ये जावून अफजल खानाला मुजरा करून आल्याची टीका यावेळी मुंडे केली.
