गांधी घराण्याला नाव ठेवण्याआधी तुम्ही काय दिवे लावले ते सांगा, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल
उल्हासनगर : इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. आता त्यांची पुढील पिढी देशसेवेसाठी तत्पर आहे. पण तुम्ही काय दिवे लावले ते पहिल्यांदा सांगा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.
मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ गोलमैदान येथे सभा झाली, तेव्हा ते बोलत होते.
इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी देशाचे दोन तुकडे करून बांग्लादेशची निर्मिती केली. राजीव गांधी यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती करून देशाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आज प्रत्येकाच्या हातात जो मोबाइल दिसत आहे, तो केवळ राजीव गांधी यांनी केलेल्या प्रगतीमुळेच, असे पवार यांनी सांगितले.
“राजीव गांधींची हत्या झाली त्यावेळी सोनिया गांधी पुढे आल्या. आता राहुल गांधींनी जबाबदारी घेतली आहे. गांधी घराण्याची पुढची पिढी कधीच जबाबदारी झटकत नाही. मात्र मोदी त्यांना विचारतात तुम्ही काय केलं? पण पहिल्यांदा आपण काय दिवे लावले ते सांगा. उगाचच इतरांवर आरोप करु नका” अशा शब्दात शरद पवारांनी नरेंद्र मोदींना जाब विचारला.
या प्रचार सभेवेळी माजी उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक, संजीव नाईक, ज्योती कलानी, प्रमोद हिंदुराव व मिलिंद देवरा आदी उपस्थित होते.
