उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर निवडणूक लढवणार
मुंबई: दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारी मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार आहे. भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टींविरोधात उर्मिलाची लढत असणार आहे.
उत्तर मुंबई हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात आहे. त्यामुळे उत्तर मुंबईत गोपाल शेट्टी विरुद्ध उर्मिला मातोंडकर अशी लढाई रंगणार आहे. काँग्रेसनं उर्मिलाला रिंगणात उतरवून चुरस निर्माण केली आहे. उर्मिला मातोंडकर हीला उमेदवारी दिल्याने तेथून इच्छुक असलेल्या माजी खासदार संजय निरुपम यांचा पत्ता कट झाला आणि त्यांना उत्तर पश्चिम मधून उमेदवारी देण्यात आली.
उत्तर मुंबईतून पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रविण छेडा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू होते. मात्र छेडा यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून लढण्याची ऑफर देण्यात आली.
