अमित शाह यांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती
गुजरात: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आज गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरत आहेत. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, गृहमंत्री राजनाथ सिंह, वाहतूकमंत्री नितीन गडकरी, रामविलास पासवान उपस्थित राहिले आहेत. यांच्यासह एनडीएतील घटक पक्षांचे इतर नेतेही येथे उपस्थित राहिले आहेत.
गांधीनगरमध्ये झालेल्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली. विरोधी पक्षामध्ये कोणतीही एक विचारधारा, एक दिशा नाही आणि एक नेता नाही अशी टीका त्यांनी केली. ‘दिल मिले ना मिले हात जरूर मिलना चाहीये’ तसं या विरोधकांचे सुरू असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
मी येथे कसा आलो असा अनेकांना प्रश्न पडला असून, अनेकांच्या पोटात दुखत आहे. त्याचा इलाज आमच्याकडे आणि तुम्हा मतदारांकडे आहे’, आमच्यामध्ये मतभेद नक्की होतो, मात्र आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मनाने एक झाले आहे, दोन्ही पक्षांच्या विचारधारा एकच असल्याने आम्ही एकत्र आलो आहोत असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गांधीनगरचे भाजपचे उमेदवार अमित शहा यांना शुभेच्छा दिल्या.
पुढे ते म्हणाले बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊनच मी अमित शहांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो आहे.
गांधीनगरच्या या सभेत सर्वजण ‘मोदी, मोदी’ अशा घोषणा देत आहेत. मी विरोधकांना आवाहन करतो की, त्यांचा नेता कोण आहे, हे त्यांनी सांगावे. आमची मात्र मने जुळलेली आहेत. हिंदुत्त्व हा आमचा श्वास आहे आणि तो थांबला तर जगायचे कसे?, फक्त हात मिळवून काही होत नाही मन जुळणेही तेवढेच गरजेचं आहे, अशा शब्दात उद्धव यांनी विरोधकांना टोला लगावला.
अर्ज दाखल करण्यापूर्वी अमित शहा यांनी आपले कुटुंबीय तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर नारणपूरमध्ये जात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अमित शाह यांच्या रोड शोला सुरुवात करण्यात आली.
