रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात; कर्जधारकांना दिलासा
नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी कपात केल्यामुळे रेपो रेट ६.२५ वरून ६.०० टक्क्यांवर आले आहेत. त्यामुळे आता कर्ज स्वस्त होणार आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्जासह इतर कर्ज घेणाऱ्यांना फायदा होणार आहे. आता बँका रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटनुसारच कर्जाचे हप्ते ठरवणार असल्याने ईएमआय कमी होणार आहे. या निर्णयामुळे गृहकर्ज स्वस्त झाल्याने घर घेणे सुलभ होणार आहे.
रेपो दरात कपात केल्याने बँकांना आता कमी व्याज दरात गृहकर्ज, कार तसेच अन्य कर्जे ऑफर करणे शक्य होणार आहे. तसेच आरबीआयने २०१८-१९ या आर्थिक वर्षातील देशांतर्गत उत्पन्न वाढीचा दर ७.२ टक्के राहील, असा अंदाज बांधला आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये जीडीपी वाढीचा दर ७.४ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता.
शक्तीकांत दास यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यापासून सलग दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यात दोनदा व्याजदरात कपात करणारा भारत हा आता आशिया खंडातील एकमेव देश झाला आहे.
