मोदींनी जनतेचा विश्वासघात केला : राहुल गांधी
अहमदनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आतापर्यन्त खोटी आश्वासनं व खोटी स्वप्न दाखवली. मोदींनी जनतेचा विश्वासघात केला, अशी टीका करत, जर देशात काँग्रेसचे सरकार आले, तर देशातील पाच कोटी कुटुंबाच्या खात्यांवर पाच वर्षांत प्रत्येकी ३ लाख ६० हजार रुपये जमा करणार आहोत, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली.
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस – राष्ट्रवादी महाघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ जाणता राजा मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
मला तुम्हीच सांगा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी आश्वासनं दिली ती त्यांनी पूर्ण केली का? अच्छे दिन आयेंगे, शेतकर्यांची कर्जमाफी करणार, दोन कोटी तरुणांना नोकरी देणार अशी सर्व आश्वासने दिली. मात्र, ते एकही आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत. सध्या देशात दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे.
काँग्रेसचे सरकार सत्तेत आलं तर आम्ही जर शेतकर्यांचे कर्ज थकले, तर त्या शेतकर्यांना जेलमध्ये जाऊ देणार नाही असा कायदा करणार असून, शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडू, असा विश्वास राहुल यांनी जनतेला दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्योगपती अनिल अंबानी यांना राफेल प्रकरणात ३० हजार कोटी रुपयांचा फायदा करून दिला त्याचप्रमाणे मोदींच्या मदतीने मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या देशातून पळून गेल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला.
