धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामुळे जेन-झी च्या आंदोलनाला मिळाले मोठे यश
मुंबई, दि. २६ः नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाचे पडसाद देशभर उमटल्यानंतर आणि ‘सीजेपी’सह विद्यार्थी संघटनांनी लावून धरलेल्या मागणीनंतर, अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी २५ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
यापूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दादर येथील शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरादरम्यान संयुक्त मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मात्र, शिक्षणमंत्र्यांनी पद सोडल्यामुळे हा विरोध मोर्चा रद्द करून त्याचे रूपांतर भव्य ‘जल्लोष मोर्चा’मध्ये करण्यात आले.
दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर आयोजित या रॅलीला संपूर्ण महाराष्ट्रातून तरुणाईचा अथांग जनसागर लोटला होता. हातात राष्ट्रध्वज घेतलेले हजारो तरुण-तरुणी या जल्लोषात सहभागी झाले होते. ए. आर. रहमान यांच्या देशभक्तीपर गीतांच्या सुरांनी परिसर दुमदुमून गेला होता. व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे आगमन होताच उपस्थित जनसमुदायाने जोरदार घोषणाबाजी करत परिसर डोक्यावर घेतला. दोन्ही नेत्यांनी उपस्थितांचे आभार मानत तरुणांच्या या ऐतिहासिक विजयाचे कौतुक केले.
‘भाजप विरुद्ध भारत’ संघर्षाची ही तर सुरुवात: उद्धव ठाकरे
व्यासपीठावरून जनसमुदायाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली.
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, “केंद्र सरकारला नमवणाऱ्या देशातील तरुणाईचं मी अभिनंदन करतो. मुंबईत जमलेली ही गर्दी कोणतीही निवडणूक झाल्यानंतरची नाही, तर अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकल्यानंतरची आहे. ही संघर्षाची सुरुवात आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा आहे. या संघर्षात जातपात, धर्म विसरुन सहभागी व्हा. मी भारतीय आहे, ही जाणीव ठेवा.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारचा समाचार घेताना ते पुढे म्हणाले, “एका झुरळाने हुकूमशहाला नमवले आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. मोदीजी आतातरी देशाकडे लक्ष द्या. तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून इतर पक्ष फोडण्यात बिझी आहेत. त्यांना आतातरी म्हणा देशाचं काम करा. अर्थमंत्री निर्मला सीतारामन महागाई, घसरणारा रुपया यावर एक शब्द बोलत नाहीत फक्त पेपरफुटीचे फायदे सांगत आहेत. राजनाथ सिंह हे देशाचे संरक्षणमंत्री आहेत, पण आता ते धर्मेंद्र प्रधानांचं रक्षण करत होते. आपले खड्डामंत्री माफ करा, रस्तेमंत्री नितीन गडकरी हे इथेनॉलवर बोलत आहेत.”
पेपरफुटीमुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर घणाघात केला, “मला मोदींना सांगायचं आहे की, तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या. त्यापेक्षा जास्त यातना नीट paperफुटीनंतर आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना झाल्या असतील. निवडणुकांना आणखी दोन-अडीच वर्षे शिल्लक आहेत. पण निवडणुका गेल्या खड्ड्यात, मोदींना मतं चोरता येतील, पण माणसं चोरता येणार नाहीत. ही ठिणगी आता जागती ठेवणं आपल्या सगळ्यांचे काम आहे. देशातील तरुणाईने देशाच्या इतिहासातील सुवर्ण पान लिहले आहे. आता आलेली ही जाग जाऊ देऊ नका, सत्ताधाऱ्यांची मस्ती सहन करु नका.”
‘जेन झी’ने सरकारला आपली ताकद दाखवून दिली: राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात या आंदोलनाच्या यशाचे श्रेय थेट देशातील युवा पिढीला दिले.
राज ठाकरे उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, “तुम्ही जे आंदोलन देशभरात पेटवलं आणि त्याला जे यश आलं त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. या देशातील जेन झी सरकारच्या झिंज्या कशा उपटते, हे या आंदोलनातून कळाले.”
आपले भाषण पुढे नेण्यापूर्वी राज ठाकरे यांनी नीट गैरव्यवहारामुळे नैराश्यात येऊन आत्महत्या केलेल्या २१ हतबल विद्यार्थ्यांची नावे जाहीरपणे वाचून दाखवली आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून मैदानावरील हजारो उपस्थितांना दोन मिनिटांचे मौन पाळण्याचे आवाहन केले.
