उमेदवारी अर्ज भरण्याआधी वाराणसीत पंतप्रधान मोदींचा रोड शो
नवी दिल्ली: आज (ता.२६ ) पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदी आज (ता.२५) वारणसीत भव्य रोड शो करुन शक्तीप्रदर्शन करणार आहे. यासाठी वाराणसीत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीतल्या बाबतपूर विमानतळावर उतरणार आहेत. विमानतळावरून मोदी थेट बनारस हिंदू विश्वविद्यालयात जाणार आहेत. तिथे पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणार आहेत. त्यानंतर मोदींचा रोड शो सुरू होणार आहे.
मोदींच्या या रोड शोमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिरोमणी अकाली दल प्रमुख प्रकाश सिंग बादल यांच्यासह अनेक सहभागी होणार आहेत. या रोड शोच्या माध्यमातून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. भाजपकडून या रोड शोसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. या रोड शोनंतर पंतप्रधान मोदी गंगा किनारी आरती करणार आहे.
