‘इस्लामिक स्टेट’ (आयसिस) ने घेतली श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी
रविवार दि.२१ रोजी श्रीलंकेची राजधानी कोलंबो मध्ये झालेल्या शक्तिशाली साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण जग हादरून गेले. चर्च व हॉटेल्स मध्ये झालेल्या स्फोटांत आतापर्यंत जवळपास ३२० लोकं मृत्युमुखी व ५०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात ब्रिटन, अमेरिका, तुर्कस्तान, भारत, चीन, पोर्तूगाल या देशातील नागरिकही मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत. हे हल्ले कोणी घडवले असावेत याबाबत गेले दोन दिवस अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. पण शेवटी आज ‘इस्लामिक स्टेट’ (आयसिस) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे कळते.
२००९ च्या आधी श्रीलंकेत ‘लिबरेशन ऑफ तमिल इलम’ (एलटीटीई) या दहशतवादी संघटनेने दोन दशकांहून मोठा काळ अशाच प्रकारच्या हल्ल्यांनी दहशत माजवली होती. पण प्रभाकरन च्या मृत्यूनंतर एक तप इथलं वातावरण शांत होतं. पण परवाच्या बॉम्बस्फोटांनी श्रीलंका पुन्हा त्याच दहशतीच्या छायेत गेली आहे. हल्ल्यानंतर अमेरिकेनेही या हल्ल्यात एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शंका उपस्थित केली होती. आयसीस सारखी दहशतवादी संघटना आपली पाळंमुळं जगभर पसरवतच चालली आहे. याला अटकाव कसा घालावा ही अख्या जगासमोरची मोठी समस्या आहे.
