Raj Thackarey
आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राज ठाकरे राज्यात सभा घेणार
आगामी लोकसभा निवडणूक मनसे लढवणार नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितल्या नंतर आता मनसे चक्क काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार करणार आहे.
राज ठाकरे राज्यात आठ ते नऊ प्रचार सभा घेणार आहेत. महाआघाडीच्या महत्त्वाच्या उमेदवारांच्या मतदारसंघात जाऊन राज ठाकरे मोदीविरोधी प्रचार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज ठाकरे काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या नांदेड, सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर, काँग्रेसची नवखी उमेदवार उर्मिला मातोंडकरच्या उत्तर मुंबई, प्रिया दत्त यांच्या उत्तर-मध्य मुंबई तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या बारामती, उदयनराजे यांच्या साताऱ्यात,
राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मावळ मतदारसंघात जात पार्थ पवार यांचा प्रचार करणार आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचे उमेदवार संजयदीना पाटील यांच्या ईशान्य मुंबई आणि समीर भुजबळ यांच्या नाशिक या मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेणार आहेत.
राज ठाकरे या सभा किती तारखेला घेणार आहे याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
आता राज ठाकरे या सगळ्यांसाठी प्रचार सभा काँग्रेस-राष्ट्रवादी च्या मंचावर घेतात की मनसेच्या मंचावर घेतात हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
