नारळ उत्पादन आणि उत्पादकतेत, भारत जगात अव्वल स्थानी – नरेंद्रसिंह तोमर
नवी दिल्ली, दि.२: केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने आज आंतरराष्ट्रीय नारळ समुदायाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत जगभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक नारळ दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. संयुक्त राष्ट्रांच्या आशिया आणि प्रशांत महासागर प्रदेशासाठीच्या आर्थिक आणि सामाजिक आंतरराष्ट्रीय संस्थेअंतर्गत नारळ उत्पादक देशांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय नारळ समुदायाची स्थापना केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे होते. भारताने नारळ उत्पादनात मोठी प्रगती केली आहे, असेही तोमर यावेळी म्हणाले. नारळाचे उत्पादन आणि उत्पादकता या क्षेत्रात भारत जगात तिसऱ्या स्थानी आहे, असे तोमर म्हणाले. वर्ष २०२०-२१ मध्ये नारळाचे उत्पादन २१२०७ दशलक्ष नारळे इतके होते, जे जागतिक उत्पादनाच्या ३४ टक्के एवढे आहे नारळाची उत्पादकता, प्रति हेक्टर ९६८७ नारळे इतकी असून ही जगभरात सर्वाधिक आहे. नारळाची नवी उत्पादने आणि उद्योग वाढत चालले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना रोजगार मिळतो आहे, असेही तोमर यावेळी म्हणाले.
२३व्या जागतिक नारळ दिवसाची संकल्पना “कोविडच्या पार्श्वभूमीवर एक सुरक्षित, एकात्मिक लवचिक आणि शाश्वत अशा नारळ उत्पादकांचा समुदाय निर्माण करणे” अशी आहे. नारळ विकास महामंडळ दरवर्षी नारळ दिवस साजरा करुन नारळाच्या महत्त्वाविषयी जनजागृती करणे आणि त्याकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असते.
यावेळी बोलतांना, तोमर म्हणाले की, नारळाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव आहे. शेतकरी आणि उद्योजकांनी नारळाच्या क्षेत्राचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने कृषीविषयक तरतूदीत मोठी वाढ केली आहे, किमान हमीभावाचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो आहे. पंतप्रधान कायम शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याविषयी विचार करत असतात, असे त्यांनी सांगितले. कृषी उत्पादनांचा दर्जा जागतिक बाजाराच्या तोलामोलाचा राखला जावा, जेणेकरुन निर्यातीत वाढ होऊ शकेल, असे तोमर म्हणाले.
कृषी राज्यमंत्री शोभा करंडलजे यावेळी म्हणाल्या की, “भारतात लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे, त्यामुळे आपल्या देशांतर्गत नारळ उद्योगांचे भविष्य आपल्या शेतकऱ्यांच्या संघटन बांधणीवर अवलंबून आहे, त्याशिवाय, आपण प्रक्रिया उद्योग कसा पुढे नेतो आणि त्यात मूल्यवर्धन करतो, हे ही पाहणे महत्वाचे आहे, तरच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवायला मदत होईल”, असे त्या म्हणाल्या.
कृषीसचिव संजय अग्रवाल यांनीही या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.
