गव्हाच्या पिठासाठी निर्यात बंदीतून सूट देण्याच्या धोरणात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीची मंजुरी
मुंबई, दि. २५ : गव्हाच्या पिठासाठी निर्यात बंदीतून सूट देण्याच्या धोरणात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीनं मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे आता गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर निर्बंध घालता येतील. त्यामुळे गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किमतींना आळा बसेल आणि समाजातल्या सर्वात असुरक्षित घटकांची अन्न सुरक्षा सुनिश्चित होईल.
देशातल्या १४० कोटी लोकांची अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी या वर्षी मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, त्यामुळे परदेशी बाजारपेठेत गव्हाच्या पिठाची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते जुलै या काळात भारतातून निर्यातीमध्ये दोनशे टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात गव्हाच्या पिठाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.
