राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकर्यांची त्रेधा-तिरपीट
वाशिम, दि. ३: राज्यात आज अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा तालुक्यांत आजही मुसळधार पाऊस होत आहे. परिसरातले सर्व नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. कारंजा ते यवतमाळ मार्गावर अडाण नदीला पूर आला असून, बोरी-अरब वाहतूक बंद पडली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात आज सकाळी रिमझिम पाऊस पडला. त्यानंतर दिवसभर हवामान कोरडे होते. गेल्या चोवीस तासांत कोरची तालुक्यात बेळगांव इथं सर्वाधिक ६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
हिंगोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हळदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पावसामुळे हिंगोली शहराच्या सखल भागात पाणी साचलं होतं. संध्याकाळी साडेचार च्या सुमारास अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जिल्ह्यातील औंढा – नागनाथ, खुडज, कळमनुरी, कुरुंदा, बाळापूर, वारंगाफाटा, डिग्रस (कऱ्हाळे), कौठा आदी ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मागच्या दहा दिवसांपासून वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस अधून-मधून हजेरी लावत आहे. त्यामुळे वाळायला ठेवलेल्या हळदीसह इतर उन्हाळी पिकांचं नुकसान होत असल्याचं कळतंय. बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना शेती मशागतीच्या कामात व्यत्यय येत आहे. संततधार पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवत असून ट्रॅक्टर च्या साहायाने काम करणं अवघड झालं आहे. सद्यस्थितीत सर्वत्र पावसाळा सदृश वातावरण आहे.
*फोटो प्रतीनिधिक आहे
Source – AIR
