वयाच्या ६७व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
मुंबई, दि. १०: ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज प्रदीर्घ आजाराने निधन झालं. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. ते ६७ वर्षांचे होते. मराठी नाट्य व चित्रपट सृष्टीतील हास्यसम्राट म्हणवले जाणाऱ्या विजय कदम यांनी विविध मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका केल्या.
१९८० आणि ९०च्या दशकात त्यांनी रंगभूमीवर केलेल्या विनोदी भूमिका प्रचंड गाजल्या. प्रायोगिक रंगभूमीवरुन कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कदम यांनी टुरटूर या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगमंचावर पदार्पण केलं. त्यानंतर विच्छा माझी पुरी करा, हे त्यांचं वगनाट्यही रसिकांनी उचलून धरलं. हलकंफुलकं हे देखील त्यांचं लोकप्रिय नाटक. प्रभावी आवाज, संवादफेक आणि भूमिकेत शिरुन सादर करण्याची त्यांची क्षमता ही त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्यं. रथ चक्र या नाटकातून तसंच मोठ्या आणि छोट्या रुपेरी पडद्यावरही त्यांनी अनेक अनेक भूमिकांमधून सकस अभिनयाचं प्रत्यंतर दिलं. नाट्यदर्पणचा सर्वोत्कृष्ट लोकनाट्य कलाकाराचा पुरस्कार त्यांना मिळाला होता.
Source – AIR
