सदस्यत्व रद्द केल्या नंतर राहुल गांधी यांची पत्रकार परिषद
नवी दिल्ली, दि. २५: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सदस्यत्व शुक्रवारी रद्द करण्यात आले. लोकसभेच्या सचिवालयाने एक अधिसूचना जारी करून म्हटले आहे की, सुरत येथील न्यायालयाने एका फौजदारी मानहानीच्या प्रकरणात त्यांना २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. याच मुद्द्यावर राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेत आहेत.
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील १० महत्वाचे मुद्दे
१. राहुल गांधी म्हणाले, देशातील लोकशाही संपवण्याची रोज नवनवी उदाहरणे समोर येत आहेत. मी संसदेत सभापतींना पुरावे दिले आणि विचारले की, अडाणींकडे २०,००० कोटी रुपये कुठून आले आणि याच मुद्द्यावर त्यांनी माझे संसद सदस्यत्व रद्द केले.
२. राहुल गांधींनी विचारले की अडाणींकडे २०,००० कोटी रुपये कुठून आले आणि त्यांचा पंतप्रधानांशी काय संबंध? राहुलने दावा केला की, हे पैसे एका चिनी उद्योगपतीने अदानी यांना दिले होते. अडाणींकडे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रकल्प आहेत, त्यामुळे मला देशाच्या सुरक्षेची भीती वाटते.
३. राहुलचा आरोप, स्पीकरने त्यांचे ऐकले नाही. ते म्हणाले की, मी स्पीकरला पत्र लिहून अडाणींकडे विमानतळाचे नियम बदलले असल्याचे सांगितले. पण त्यांनी काहीच केले नाही. बदललेल्या नियमांची प्रतही मी त्यांना पाठवली.
४. गांधी म्हणाले, मी लंडनमध्ये असे कोणतेही काम केले नाही ज्यामुळे देशाची प्रतिमा खराब होईल. मी परकीय सैन्याकडून कोणत्याही प्रकारची मदत मागितलेली नाही. असे असतानाही अडाणींच्या मुद्द्यावरून लक्ष वळवण्यासाठी केंद्रीय मंत्री सभागृहात माझ्याबद्दल खोटे बोलले.
५. लंडनहून परतल्यानंतर मी सभापतींना पत्र लिहून संसदेत माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देण्याची परवानगी मागितली. पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. मी सभापतींना विचारले की मला संसदेत का बोलू दिले जात नाही, ते हसले आणि म्हणाले, मी ही परवानगी देऊ शकत नाही, चला चहा घेऊ.
६. राहुल गांधी म्हणाले, मी अडाणींवर प्रश्न विचारणे थांबवणार नाही. मी सरकारला घाबरणार नाही. मी या आरोपांना, न्यायालयांना आणि शिक्षांना घाबरत नाही, ते वाट्टेल ते करतील पण मी त्यांना प्रश्न विचारत राहीन.
७. आजच्या भारतात, राजकीय पक्षांना प्रेसमधून मिळणारा पाठिंबा आता उपलब्ध नाही, परंतु आम्ही प्रेसशिवाय जनतेमध्ये जाऊ. माझी भूमिका स्पष्ट आहे. ओबीसींच्या अपमानाशी संबंधित हा विषय नाही, आम्ही अडाणी आणि मोदींच्या नात्याबाबत प्रश्न विचारत राहू.
८. या देशाने मला सर्व काही दिले आहे. त्यांनी मला प्रेम आणि आदर दिला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत मी फक्त त्यांच्या बद्दलच बोलेन. मी देशाची फसवणूक करू शकत नाही. मी माझ्या लोकसभा मतदारसंघातील वायनाडच्या लोकांना पत्र लिहीन. तो मतदारसंघ माझ्या कुटुंबासारखा आहे.
९. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मला घाबरतात, मी त्यांच्या डोळ्यात माझी भीती पाहिली आहे. अडाणींवरील माझे पुढील भाषण संसदेत व्हावे असे त्यांना वाटत नाही म्हणून त्यांनी आधी लक्ष वळवले आणि नंतर मला अपात्र ठरवले.
१०. एका प्रश्नाच्या उत्तरात राहुल गांधी म्हणाले, मी तुम्हाला नर्व्हस वाटतो का? मला मजा येत आहे. या लोकांनी मला सर्वात मोठी भेट दिली आहे. माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे आणि गांधी कोणाची माफी मागत नाहीत. मला अपात्र ठरवल्यानंतर त्यांनी लोकशाही संपल्याचे संकेत दिले आहेत.
