“आपली साधने काही मिनिटांत निर्जंतुक होतील, त्यावरील 99.999% विषाणू नष्ट होतील” – कंपनीचा दावा
मुंबई: मुंबईतल्या ‘इंद्रा वॉटर’या स्टार्ट-अप कंपनीने विकसित केलेल्या ‘वज्रकवच’ या निर्जंतुकीकरण प्रणालीमुळे डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी स्वतःच्या संरक्षणासाठी वापरत असलेल्या साधनांवर असलेले कोविडचे विषाणू निष्क्रिय होतात. पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट), एन-95 मास्क्स, कोट्स, ग्लोव्हज आणि गाऊन्स(ओव्हरऑल) अशा सगळ्या साधनांना निर्जंतूक करण्याची क्षमता या प्रणालीत आहे. यामुळे साहजिकच, आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई आणि इतर साधनांचा पुनर्वापर करणे शक्य झाले आहे. ही प्रणाली केवळ त्यांचेच संरक्षण करते असे नाही, तर एका अर्थाने ती पर्यावरणाचेही संरक्षण करते. कारण पुनर्वापरामुळे जैव-वैद्यकीय कचरा तयार होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच, पीपीई किट्स ची उपलब्धता वाढली असून त्यांचा खर्चही कमी झाला आहे.

“तुमची साधने काही मिनिटांत निर्जंतुक होतील”
ह्या प्रणालीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हे निर्जंतुकीकरण केवळ काही मिनिटात पूर्ण होते. “वज्र कवच” ही विद्युतभारावर चालणारी उपकरण प्रणाली असून, तिला दार असते. मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथे ‘इंद्रा वॉटर’ कारखान्यात ही प्रणाली तयार केली जाते आणि तिथून ती रुग्णालयांमध्ये पोचवली जाते.
या प्रणालीमुळे साधनांवर असलेले विषाणू एक लाख पटीने नष्ट होतात
“ वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाल्यास, आमची ही प्रणाली सूक्ष्मजीवांची संख्या एक लाख पट पर्यंत कमी करण्यास सक्षम आहे. हिच्या चाचण्यांमध्ये आम्हाला विषाणू आणि जीवाणूंमध्ये पाच लॉग (99.999%) पर्यंत घट झाल्याचे आम्हाला आढळले आहे.”, ‘इंद्रा वॉटर’ कंपनीचे सहसंस्थापक अभिजित व्ही. व्ही. आर यांनी अत्यंत अभिमानाने त्यांच्या या उत्पादनाविषयी माहिती दिली.
‘लॉग घट’ (Log reduction) म्हणजे सक्रीय सूक्ष्मजीवांची साधारण संख्या सांगणारी परिभाषा असून निर्जंतुकीकरण प्रक्रियेत, तितके सूक्ष्मजीव निष्क्रिय होत असतात.
आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैव अभियांत्रिकी विभागात, या प्रणालीची चाचणी यशस्वी झाली आणि त्यानंतर या विभागाने तिला मान्यता दिली.
“वज्र कवच च्या चाचण्या आणि चाचण्यांची प्रक्रिया, अत्यंत दीर्घकाळ सुरु होती. एशेरिचिया विषाणू MS2(हा एक एकल-धागा असलेला आरएनए विषाणू असून मानवी श्वसनव्यवस्थेतील विषाणू, जसे की फ्लूचे आणि कोरोना विषाणू यासारखा विषाणू म्हणून ओळखला जातो) तसेच ई. कोली स्ट्रेन C3000 वर त्याची चाचणी केली गेली. एका पीपीईवर विषाणू आणि जीवाणूंचे अनेक नमुने पसरवण्यात आले आणि त्यानंतर वज्र कवच प्रणालीत हा पीपीई सूट ठेवण्यात आला.निर्जंतुकीकरण प्रक्रीयेनंतर, पीपीई बाहेर काढण्यात आला, त्यानंतर त्यावरील विषाणूंचे नमुने पुन्हा तपासले गेले ज्याद्वारे, विषाणूंच्या वाढीचे प्रमाण आणि लॉगमधील घट तपासण्यात आली.” अशी माहिती अभिजित यांनी दिली. या प्रणालीत विविध पातळ्यांवर निर्जंतुकीकरण प्रक्रिया होत असते, ज्यात अद्यायावत ऑक्सिडेशन, कोरोना डीस्र्चार्ज आणि युव्ही-सी लाईट स्पेक्ट्रम यांचा समावेश असून, ती पीपीईवर असलेले विषाणू, जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीवांना नष्ट करते. ज्यामुळे 99.999% क्षमतेने निर्जंतुकीकरण शक्य होते, असेही अभिजित यांनी सांगितले.
वज्र कवचाची कल्पना
वस्तू, साधनांना एकदा वापरुन फेकून देण्यापेक्षा, त्यांचा पुनर्वापर करता येईल का, या बचतीच्या साध्या मात्र महत्वाच्या विचारातून ‘वज्र कवच’ संकल्पनेचा जन्म झाला, अशी माहिती अभिजित यांनी दिली. “मार्च 2020 मध्ये लागू असलेल्या देशव्यापी टाळेबंदीच्या काळात, वज्र कवच या संकल्पनेचा जन्म झाला. या महामारीचा सामना करण्यात, आपण देशाला कशी मदत करु शकू, यावर आम्ही सतत विचार करत असू, त्यावेळी पीपीई किट्स आणि एन-95 मास्कची खूप जास्त मागणी असल्याचे आम्हाला जाणवले. आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट्स आणि इतर वैद्यकीय उपकरणे पुरवण्यासाठी देशाला बरीच मेहनत करावी लागते. त्यामुळे आमच्या डोक्यात ही कल्पना आली- “अशी एक सुलभ निर्जंतुकीकरण प्रक्रिया सुरु करायची, ज्यातून, आपल्या कोरोना योद्ध्यांना त्यांचे मास्क आणि पीपीई यांचा पुनर्वापर करता येईल.”
